लंडन / वृत्तसंस्था
अनुभवी जलद गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचे बुधवारी नवा कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लिश कसोटी संघात पुनरागमन झाले. अँडरसन व ब्रॉड यांना या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात विंडीज दौऱयातून वगळले गेले होते. इंग्लंडला ऑस्ट्रेलियात 0-4 असा ऍशेस पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता 39 वर्षीय अँडरसन व 35 वर्षीय ब्रॉड न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱया 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लिश संघात परतत आहेत. नवा कर्णधार स्टोक्स व नवे प्रशिक्षक ब्रेन्डॉन मॅक्युलम यांच्यामुळे व्यवस्थापकीय स्तरावरही बदल झाले आहेत.
स्टोक्स व मॅक्युलम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निवडल्या गेलेल्या पहिल्या संघात यॉर्कशायरचा फलंदाज हॅरी ब्रूक व डरहॅमचा सीम गोलंदाज मॅथ्यू पॉट्सचा समावेश आहे. विंडीजमध्ये मालिका गमवावी लागल्यानंतर पायउतार झालेल्या जो रुटला येथे संघात स्थान देण्यात आले आहे.
14 पैकी 9 कसोटी सामने व 4 मालिका गमवाव्या लागल्यानंतर इंग्लंडची वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत तळाच्या स्थानापर्यंत घसरण झाली. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्यापक फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान कसोटी चॅम्पियन न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेला लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या माध्यमातून सुरुवात होईल. ही लढत 2 जूनपासून खेळवली जाणार आहे.
अँडरसन व ब्रॉड इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहेत. मात्र, ऍशेसमधील दारुण पराभवानंतर त्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर होण्यात याची किंमत मोजावी लागली. मात्र, आता जोफ्रा आर्चर, मार्क वूड, ऑलि रॉबिन्सन, सॅम करण, सकिब महमूद व मॅट फिशर हे अन्य जलद गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने पुन्हा एकदा अँडरसन व ब्रॉड यांना पसंती देण्यात आल्याचे संकेत आहेत.
बॉक्स (18 एसपीओ 03-मॅथ्यू मॉट)
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मॅथ्यू मॉट इंग्लंडचे नवे प्रशिक्षक
मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात मॅथ्यू मॉट नवे प्रशिक्षक असतील, अशी घोषणा ईसीबीने बुधवारी केली. 48 वर्षीय मॉट यांच्याशी इंग्लिश क्रिकेट मंडळाने 4 वर्षांचा करार केला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ ऍमस्टरडममध्ये 3 वनडे खेळेल, त्यावेळी मॉट प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारतील, असे संकेत आहेत.
मॉट यांनी 2015 पासून ऑस्ट्रेलियन महिला संघाला प्रशिक्षण दिले असून या 7 वर्षांच्या कालावधीत सदर संघाने उत्तम कामगिरी केली आहे. या संघाने सलग आयसीसी टी-20 वर्ल्डकप जेतेपदासह वनडे विश्वचषक जेतेपद पटकावले. ते चारवेळा ऍशेस मालिकेत अपराजित राहिले. मॉट यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला संघाने सलग 26 वनडे सामने जिंकण्याचा पराक्रमही गाजवला.