दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी : गणेश मंदिरांतून धार्मिक कार्यक्रम ; मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक आरास-विद्युत रोषणाई
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने गणेश मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर गणेश मंदिरे पूर्ववत गजबजलेली पाहावयास मिळाली. शहरातील चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिर, मिलिट्री विनायक मंदिर, शांती कॉलनी येथील सिद्धिविनायक देवस्थान, खडेबाजार शहापूर येथील गणपती देवस्थान, अनगोळ नाका येथील स्वयंभू गणेश मंदिर यासह इतर गणेश मंदिरांतून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
चन्नम्मा चौक गणेश मंदिर


चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त सकाळी अभिषेक आणि आरती झाली. त्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी वर्दळ सुरू होती. रात्री महाआरती करण्यात आली. चोपडे कुटुंबीयांतर्फे तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शांती कॉलनी सिद्धिविनायक देवस्थान
शांती कॉलनी येथील सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिन आणि अंगारकी संकष्टी उत्साहात साजरी झाली. वर्धापन दिनानिमित्त सोमवारी वैजनाथ गिलबिले यांच्या हस्ते गणहोम झाला. मंगलमूर्तीची पूजा बाळकृष्ण गिंडे यांच्या हस्ते झाली. याबरोबरच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी 3 हजारहून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला. मंगळवारी सकाळी मंदिरात अभिषेक, पूजा आणि महाआरती झाली. रात्री कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अनगोळ नाका टिळकवाडी स्वयंभू गणेश मंदिर


अनगोळ नाका, टिळकवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात पहाटे काकड आरती, सकाळी 7 ते 8 अभिषेक, त्यानंतर महाआरती करण्यात आली व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी मंदिरात सकाळपासून गर्दी झाली होती. शिवाय उपवासासाठी खिचडी आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दामोदर भोसले, सचिव राजू जाधव, सदस्य सुरेश पाटील, रमेश गवळी, मारुती कदम, शंकर शिंदे, रामचंद्र जोशीलकर यासह इतर सदस्य उपस्थित होते.
खडेबाजार शहापूर गणपती देवस्थान
खडेबाजार शहापूर येथे गणपती देवस्थानात संकष्टीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. पहाटे दही आणि दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ट्रस्टींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नैवेद्य दाखविण्यात आला. मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. शिवाय भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कपिलेश्वर मंदिर


कपिलेश्वर मंदिरातील गणपती मंदिरात संकष्टीनिमित्त रुद्राभिषेक, अथर्वशीर्ष पठण, पंचामृत अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम झाले. नागराज कट्टी यांनी पौरोहित्य केले. सुनील बाळेकुंद्री व राजू भातकांडे यांच्या हस्ते अभिषेक झाला. या निमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री महाआरती करण्यात आली. यावेळी अभिजित चव्हाण, राहुल करणे, विवेक पाटील यासह ट्रस्टी उपस्थित होते.