मोफत शस्त्रक्रिया करून पेशाचे सकारात्मक रूप केले सिद्ध : फेसबुक प्रेंड्स सर्कलचे कार्य कौतुकास्पद
प्रतिनिधी /बेळगाव
‘दारिद्रय़ातही तान्हुल्याच्या उपचारासाठी धडपड’ या तरुण भारतमध्ये शनिवार दि. 11 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर बेळगावकर मदतीसाठी पुढे आले. अनेकांनी त्या कुटुंबाला आर्थिक आणि अन्य स्वरुपात मदत केली. इतकेच नव्हे तर यश हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्या तान्हुल्यावर मोफत शस्त्रक्रिया करून आपल्या पेशाचे सकारात्मक रूप सिद्ध केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पोटाची खळगी भरण्यासाठी सीमाभागातील गावांमध्ये साईबाबा, स्वामी समर्थ अशा देवदेवतांच्या पालख्या घेऊन गावोगावी फिरणारे सोळंखे कुटुंब तुटपुंज्या कमाईतून आपल्या जीवनाचा रहाटगाडा चालवत आहेत. मूळच्या मानेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथील या कुटुंबाचा मुक्काम सध्या शिवमनगरच्या माळरानावर आहे.
अशातच कुटुंबातील प्रवीण नावाचा एक वषीय बालक किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने पैशांअभावी त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले होते. त्याच्या उपचारासाठी आई, आजी यांनी आपल्या अंगावर असलेले थोडेफार सोने विकून आतापर्यंत उपचार केले. पण एकीकडे कष्टाची मीठभाकर खाताना होणारी ओढाताण व दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारा उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्मयाबाहेर असल्याने परिस्थितीचे चटके सहन करणारे सोळंखे कुटुंब हतबल झाले होते.
तरुण भारतने दि. 11 जून रोजीच्या अंकात या कुटुंबाची व्यथा मांडणारे वृत्त प्रसिद्ध करताच फेसबुक प्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यातच यश हॉस्पिटलनेही प्रवीणच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आणि डॉ. एस. के. पाटील व डॉ. संगीता एस. पाटील व सर्जन विजय पुजार, डॉ. बी. एस. कोडलीवालीमठ व हुसेन मगदुमसाब यांनी माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्याच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली.
फेसबुक प्रेंड्स सर्कलने इतर सामाजिक कार्याकर्त्यांच्या माध्यमातून या कुटुंबाला आर्थिक मदत, त्याचबरोबर अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी यांनी बाळाचे ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल डॉ. विजय पुजार व यश हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एस. के. पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
संतोष दरेकर, अवधूत तुडयेकर यांना प्रमाणपत्र
या मुलाच्या उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर तसेच अवधूत तुडयेकर यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या प्रयत्नांची नोंद घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, नुकतेच बेळगावहून बदली झालेले डॉ. एस. व्ही. मुन्याळ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले आहे.