डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई : वाहनधारकांचे हाल
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याच्या विकासाचे काम रखडले आहे. तसेच येथील डेनेज वाहिनी तुंबल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम झाले नसल्याने अनगोळ-वडगाव संपर्क रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी वाहनधारकांना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.
अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याचे काम सुरू करून वर्ष उलटले पण पूर्ततेसाठी मुहूर्त मिळत नाही. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने परिसरातील रहिवाशांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या रूंदीकरणासाठी ठिकठिकाणी इमारतींचे बांधकाम हटविण्यात आले. तसेच हा रस्ता खराब झाल्याने खड्डेदेखील निर्माण झाले आहेत. रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने रस्त्याची दुरूस्ती लवकर होईल, अशी अपेक्षा होती. पण वर्ष उलटले तरी हे काम अर्धवट आहे. रस्त्याशेजारील गटारीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. तसेच नाल्यावर सीडी बांधण्याचे काम देखील हाती घेण्यात आले होते. मात्र ही कामे कुर्मगतीने सुरू आहेत.
येथील डेनेज वाहिन्या तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. पारिजात कॉलनी परिसरात सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. अलीकडेच येथील डेनेज वाहिन्या घालण्याचे कामदेखील सुरू केले आहे. त्याकरिता रस्त्यावर खोदाई करण्यात आली असून, संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. वाहनधारकांना वळसा घालून दुसऱया रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. अनगोळ- वडगावला ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना हा रस्ता सोयिचा आहे. पण सध्या हा रस्ता बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असून, हे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्याच्या रूंदीकरणासह अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.