सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर दुर्लक्षपणाचा ठपका : चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
अर्भकाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागासमोर धरणे धरले. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. होन्याळ (ता. बेळगाव) येथील सुनीता उचगावकर या महिलेला प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या मंगळवारी 12 जुलै रोजी मध्यरात्री सुनीता यांना कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलला आणले.
बुधवार दि. 20 जुलै रोजी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अर्भकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबीयांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवर दुर्लक्षपणाचा ठपका ठेवून धरणे धरले. परशुराम उचगावकर व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसूती विभागासमोर ठाण मांडले. त्यावेळी या विभागासमोर गर्दी जमली.
घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱयांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. परशुराम यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. उत्तरीय तपासणीनंतर अर्भक कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी बिम्स् प्रशासनाला पत्र पाठविले असून कोणत्या कारणामुळे ही घटना घडली? यासंबंधी अहवाल मागविला आहे. शवचिकित्सा अहवाल व बिम्स् प्रशासनाचा चौकशी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.