पुणे / वार्ताहर :
पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या रागातून एकाने पत्नी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमधील सात गाड्या पेट्रोल टाकून जाळल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेरेन्स डॉमनिक जॉन (रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी एलिना आयझीक जेकब (वय 24, रा. पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरेन्स जॉन व एलिना जेकब यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र, कौटुंबिक कारणावरून दोघांच्यात वाद झाल्याने ते विभक्त राहत होते. तक्रारदार एलिना जेकब यांनी पती टेरेन्स जॉन यांच्याविरोधात न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्याची नोटीस जॉन यांना मिळाली. याचा राग मनात धरुन जॉन 13 मार्चला पहाटे पत्नी एलिना राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये आला. त्याने पत्नीच्या दुचाकीसह अन्य चार दुचाकी, एक रिक्षा आणि एक चारचाकी पेट्रोल ओतून जाळली. त्यानंतर तो फरार झाला.
अधिक वाचा : एनआयएचे पुण्यात छापे, एका संशयिताची चौकशी
दरम्यान, पार्किंगमध्ये गाडय़ांना लागलेली आग पाहून स्थानिकांनी पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग विझेपर्यंत गाडय़ांचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.