ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody period extended) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambeer singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडी आणि सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. मागील वर्षी 2 नोव्हेंबरला सीबीआयने अनिल देशमुख यांना अटक केली. सुरुवातीला देशमुखांची रवानगी सीबीआय न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. सध्या ते आर्थर रोड कारागृहात आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सध्या देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू आहे.
देशमुख यांचा सीबीआय कोठडीचा कालावधी 16 एप्रिलला संपुष्टात येत असल्याने तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सीबीआयने केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. सध्या देशमुख यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली.