ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शंभर कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला आहे. त्यांच्या जामिनाला उच्च न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी देशमुख यांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती देण्याची विनंती केली होती. ती विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली होती. उद्या ही मुदत संपत असताना सीबीआयने पुन्हा जामिनाला 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे. त्यामुळे देशमुखांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला आहे.