ठेकेदाराकडून स्थगिती : सध्या पॅचवर्क कामाला सुरुवात
वार्ताहर /रामनगर
गेल्या चार वर्षांपासून अनमोड महामार्गाचे काम या ना त्या कारणास्तव अर्धवट असून यापूर्वी पर्यावरणाच्या कारणामुळे न्यायालयाने स्थगिती आणल्यामुळे या महामार्गाचे काम लांबणीवर पडले होते. त्यानंतर न्यायालयाची स्थगिती हटविण्यात आली. व पुन्हा टेंडर प्रक्रियाही सुरू झाली. परंतु आता पूर्वी या महामार्गाचे काम घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन नामक ठेकेदाराने आपल्याला 35 कोटी रुपये रस्त्याच्या कामाचे येणे शिल्लक असल्याच्या कारणास्तव न्यायालयातून पुन्हा स्थगिती आणली आहे. त्यामुळे पुन्हा महामार्गाचे काम लांबणीवर पडले आहे.
शासनाचा कोटींचा निधी वायफळ
महामार्गाच्या कामाच्या स्थगितीमुळे आणखी किती वर्षे या मार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांना मरण यातना भोगाव्या लागणार, असे बोलले जात आहे. तर सद्यपरिस्थितीत या महामार्गाची डागडुजी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेकदा डागडुजी करून शासनाचा कोटींचा निधी मात्र वायफळ जात असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.