वृत्तसंस्था /बेंगळूर
येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडास्पर्धेत पाचव्या दिवशी महिलांच्या 87 किलोवरील वजन गटात एमटी ऍन मारियाने वेटलिफ्टींग प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेच्या पदकतक्त्यात जैन विद्यापीठाने आघाडीचे स्थान मिळविताना 10 सुवर्ण, 4 रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 15 पदकांची कमाई केली.
बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या ऍन मारियाने वेटलिफ्टींग प्रकारात 129 किलो वजन उचलत यापूर्वी मनप्रित कौरने क्लिन आणि जर्कमध्ये नोंदविलेला 128 किलोचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. 24 वर्षीय ऍन मारियाला या क्रीडाप्रकारात एकूण 231 किलो वजन उचलण्याचा स्वतःच्याच राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पाच क्रीडाप्रकारात एकूण 17 पदकांसाठी लढती झाल्या. दिवसभरात पाच नवे स्पर्धा विक्रम आणि एक नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला. या स्पर्धेत देशातील 63 विद्यापीठानी आपला सहभाग दर्शविला असून 29 सुवर्णपदकांचे मानकरी निश्चित झाले आहेत.
बुधवारी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी अण्णा विद्यापीठाच्या पुरूष जलतरणपटूंनी 4ƒ100 मी. मिडलेमध्ये नवा स्पर्धा विक्रम नोंदवित सुवर्णपदक मिळविले. तर पुरूषांच्या 4ƒ100 मी. फ्रीस्टाईलमध्ये यजमान जैन विद्यापीठाने सुवर्णपदक मिळविले. बॅडमिंटनमध्ये जैन विद्यापीठाने पुरूष आणि महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदके मिळविली. नेमबाजी प्रकारात मिश्र सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसिका कुळवे आणि गजानन खंडागळे यांनी सुवर्णपदके मिळविली. मणिपाल विद्यापीठाच्या मानिनी कौशिक आणि यश वर्धन यांनी रौप्यपदक तर 10 मी. एअर रायफल वैयक्तिक नेमबाजीत गजाननने कांस्य मिळविले.