प्रतिनिधी /तिसवाडी
डोंगरी मंडूर येथील पारपळी डोंगरावरील श्री नवदुर्गा देवीचा वर्धापनदिन मोठय़ा थाटात आणि उत्साहात पार पडला. यावेळी डोंगरी मंडूर, नेवरा, आजोशी तसेच परिसरातील भक्तगण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पारपळी डोंगरावरील एका खडकावर पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार श्री गावशीकान्न देवी अर्थात नवदुर्गा देवीच्या त्या पाऊलखुणा आहेत. नेवरा येथील गावशी हे नवदुर्गेचे मूळ स्थान आहे. पोर्तुगीजांच्या धर्मांध राजवटीतील बाटाबाटीच्या कळात देवीचे गावशी या स्थळातून फोंडा तालुक्यातील मडकई गावात स्थलांतरीत होताना देवीने पुढची पाऊले या डोंगरावरून मडकईत टाकली. मडकईच्या ग्रामस्थांनी मडकईत नवदुर्गा देवीची स्थापना केली. आज तिथे मोठे देवस्थान आहे.
पारपळी डोंगरावर नवदुर्गा देवीची जिथे पाऊले आहेत त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून पूजा अर्चा सुरु होती. गेल्यावर्षी त्या पावलांच्या ठिकाणीच देवी गावशीकान्न मूर्तीची प्रतिष्ठापन करण्यात आली. नुकताच त्या पारमळीच्या डोंगरावर देवीचा पहिला वर्धापनदिन मोठय़ा थाटात पार पडला. विविध धार्मिक विधी, भजन, आरत्या, तीर्थप्रसाद त्याचप्रमाणे महानैवेद्य झाला. अनेक भक्तांनी देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ घेतला. या देवीच्या स्थळाकडे जाताना चढणी चढून जावे लागत असून त्या ठिकाणी रस्ता झाल्यास भाविकांची चांगली सोय होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.