ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे-भाजप सरकारने आज विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे-भाजप युतीच्या विजयाच्या विधानभवनात घोषणा देण्यात आल्या. बहुमताच्या प्रस्तावावर मतदान करणाऱ्यांचे आणि बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आभार मानत मविआला टोला लगावला.
फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल विचाराचे पाईक आणि कर्मावर आढळ निष्ठा असलेले आहेत. शिंदे कुशल संघटक आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर अनंत दिघेंचा प्रभाव शिंदे त्यांच्यावर आहे. एक शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे गेलेत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी जेल, कोठडी भोगली आहे. इतके असूनही ते पुन्हा सामान्य माणसाच्या सेवेत उभे राहतात. महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक होतं. मी पुन्हा येईन माझ्या या वक्तव्याची टिंगल झाली. पण आता मी एकटा आलो नाही, सगळय़ांना घेऊन आलो आहे.
विरोधात असतानाही मी कधी विचलित झालो नाही. मात्र माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार आहे. टिंगल करणाऱ्यांना मी माफ करणे हाच माझा बदला आहे. सत्ता येते आणि जाते, त्याचा अहंकार येता कामा नये. प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की जो निवडून येतो, त्याला परत पाच वर्षानंतर परिक्षा द्यावीच लागते. कोणीही असो प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं. आमचं सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेनं काम करणार नाही. मागच्या सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु असेही ते म्हणाले. या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.