फिचर विभागात 25, नॉन फिचरसाठी 20 चित्रपटांची निवड
प्रतिनिधी/ पणजी
येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) मुख्य घटक असलेल्या ’इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणाऱया 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने शनिवारी केली.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय चित्रपट विकास महामंडळातर्फे इंडियन पॅनोरमाचं आयोजन करण्यात येते. त्यानुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट ठरणाऱया फिचर व नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
प्रख्यात दिग्दर्शक तथा निवड समितीचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांच्या नेतृत्वाखाली यंदा बारा सदस्यीय समितीने फिचर फिल्मची निवड केली. या बारा सदस्यांमध्ये ए कार्तिक राजा, डॉ. अनुराधा सिंह, अशोक कश्यप, एनुमुला प्रेमराज, गीता गुरप्पा, इमो सिंग, जुगल देबाटा, शैलेश दवे, शिबू सुशेलान, व्ही. एन. आदित्य, विष्णू शर्मा, यांचा समावेश होता. या विभागासाठी एकूण 354 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 25 चित्रपटांची निवड करण्यात आली.
त्यात महानंदा (बंगाली), थ्री ऑफ अज (हिंदी), ध स्टोरीटॅलर (हिंदी), मेजर (हिंदी), सिया (हिंदी), धबारी कुरुव्ही (इरुला), हडिनेलेंटू (कन्नड), नानू कुसुमा (कन्नड), लोटस ब्लूमस् (मैथिली), आरियुप्पू (मल्याळम), साऊदी वेल्लाक्का (मल्याळम), फ्रेम (मराठी), शेर शिवराज (मराठी), एकदा काय झाला (मराठी), प्रतिक्षा (ओरिया), कुरुंगू पेडल (तामिळ), किडा (तामिळ), जय भीम (तामिळ), सिनेमा बंडी (तेलगू), कुढीराम बोस (तेलगू) यांचा समावेश आहे.
त्याशिवाय प्रमुख चित्रपटांमध्ये द काश्मिर फाईल्स (हिंदी), आरआरआर (तेलगू), टॉनिक (बंगाली), आखांडा (तेलगू), धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे (मराठी), यांचा समावेश आहे.
नॉन फिचर फिल्म्स
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक ओइनम डोरेन यांनी नॉन फीचर फिल्म विभागाच्या ज्युरिंचे नेतृत्व केले. या सहा सदस्यांमध्ये चंद्रशेखर ए, हरीश भीमानी, मनीष सैनी, पी. उमेश नाईक, राकेश मित्तल, संस्कार देसाई यांचा समावेश होता. या वर्गवारीसाठी एकूण 242 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली.
या चित्रपटांमध्ये पाताळ टी (भोतिया), तांघ (इंग्लिश), आयुष्मान (इंग्लिश), ऑदर रे (इंग्लिश), गुरूजना (इंग्लिश), हातिबोंधू (इंग्लिश), क्लिंटन (इंग्लिश), द शो मस्ट गो ऑन (इंग्लिश), खजुराहो… (हिंदी), विभाजन की विभिक्षा (हिंदी), फातिमा (हिंदी), छू मेड ना युल मेड (हिंदी), बिफोर आय डाय (हिंदी), मध्यांतर (कन्नड), वाग्रो (कोंकणी), विटीलेक्कू (मल्याळम), बियोंड ब्लास्ट (मणिपूरी), रेखा (मराठी), यानम (संस्कृत), लिटल विंग्स् (तामिळ) यांचा समावेश आहे. ‘द शो मस्ट गो ऑन’ या इंग्रजी चित्रपटाने या विभागाचे उद्घाटन होणार आहे.