Tarun Bharat

महापौर निवडीच्या तारखेची घोषणा लवकरच

31 रोजी निवडणूक होण्याची शक्यता : महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला वेग

प्रतिनिधी /बेळगाव

महापौर-उपमहापौर निवड 21 व्या कार्यकालावधीच्या आरक्षणानुसारच घेण्यात यावी, असे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला दिले आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवारी दुपारी प्रादेशिक आयुक्तांनी याबाबतची माहिती घेऊन निवडणूक तारीख निश्चित करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यासाठी अद्याप तारीख जाहीर झाली नाही. लवकरच तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. सात दिवस आधी बैठकीची नोटीस बजावावी लागणार आहे. त्यामुळे 31 जानेवारी रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुका होऊन सव्वा वर्ष होत आले. पण महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. मागील निवडणुकीवेळी तब्बल 8 महिन्यांनंतर महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात आली होती. मात्र यावेळी आरक्षणाच्या वादामुळे महापौर-उपमहापौर निवड रखडली आहे. महापालिका सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2019 मध्ये संपली होती. यादरम्यान 21, 22, आणि 23 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेसाठी आरक्षणाची घोषणा झाली आहे. मात्र यापैकी कोणत्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड करायची, असा मुद्दा प्रादेशिक आयुक्तांसमोर निर्माण झाला होता.

मागीलवर्षी महापालिका निवडणूक झाल्यानंतर याबाबत तत्कालीन प्रादेशिक आयुक्त अम्लान बिश्वास यांनी नगर प्रशासनाला पत्र पाठवून स्पष्टीकरण विचारले होते. त्यावेळीदेखील 21 व्या कार्यकालावधीनुसारच महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने दिले होते. आरक्षणाबाबत विविध घाडामोडी घडल्याने प्रादेशिक आयुक्तांनी पुन्हा एकदा आरक्षणाबाबतचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याला विचारले होते. याबाबत नगरविकास खात्याने 9 जानेवारीला पत्र पाठवून 21 व्या कार्य कालावधीनुसारच महापौर-उपमहापौर निवड करावी, असा खुलासा केला आहे. त्यामुळे 21 व्या कार्यकालावधीसाठी महापौरपद सामान्य महिला आणि उपमहापौरपद मागासवर्गीय ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे नगरविकास खात्याने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महापौर-उपमहापौर निवड केली जाणार आहे. सभागृहाच्या महापौर-उपमहापौर या दोन्ही पदांवर महिला विराजमान होणार आहेत.

15 दिवसांत सभागृहाची स्थापना होण्याची शक्यता

शासनाकडून हे स्पष्टीकरण आल्यानंतर प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील हालचाली वाढल्या आहेत. महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेची माहिती प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी दुपारी घेतली. शासनाकडून आलेल्या स्पष्टीकरणानुसार महापौर-उपमहापौर निवड करण्यासाठी गुरुवारी तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. महापौर-उपमहापौर निवडीच्या बैठकीसाठी 7 दिवस आधी नोटीस बजावण्यात येते. सदर नोटीस तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांत महापौर-उपमहापौर निवड करून सभागृहाची स्थापना होण्याची शक्यता आहे.

Related Stories

स्वातंत्र्यलढय़ात बेळगावच्या सेनांनींचे मोठे योगदान

Patil_p

शहरात चक्काजाम..!

Rohit Salunke

रेडक्रॉसतर्फे 20 बेडची ऑक्सिजन बँक सुरू

Amit Kulkarni

भाविकांच्या देणगीतून मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास

Amit Kulkarni

अपुऱया-अनियमित बससेवेचा प्रवासी-विद्यार्थ्यांना फटका

Amit Kulkarni

उमेदवारी अर्जांची आज छाननी

Amit Kulkarni