बायोपिकमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
अन्नू कपूर यांचा आगामी चित्रपट ‘मैं दीनदयाळ हूं’ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अन्नू कपूर हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट महान देशभक्ताची कहाणी मांडणार असल्याचे अन्नू कपूर यांनी सांगितले आहे.
चित्रपटात दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूचे रहस्य कशाप्रकारे आजही कायम आहे हे दाखविण्यात येणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह मुगलसराय जंक्शननजीक आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूमागील रहस्याची आजपर्यंत उकल झालेली नाही. त्यांच्यासोबत कुठलीतरी दुर्घटना घडली असावी अनेक लोकांचे मानणे आहे. तर दीनदयाळ यांची हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता असेही काही जणांचे मानणे आहे. या मर्डर मिस्ट्रीला या चित्रपटात सामील करण्यात आले आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे दूरदर्शीपणा असणारे नेता होते. त्यांनी अंत्योदयाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मी कुठल्याही पक्षाचे समर्थन करत नाही, परंतु 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरच्या भागात मोठा फरक असून तो स्पष्टपणे दिसून येत असल्याचे अन्नू कपूर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत वेदना सुरु झाल्यावर त्यांना रुग्णालयात उपचार करवून घ्यावे लागले होते. आता माझी प्रकृती बरी झाली असून मी कामावर परतल्याचे त्यांनी सांगितले आहे.