प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक वीज प्रसरण निगम नियमितमध्ये रिक्त असलेल्या ज्युनिअर असिस्टंट पदासाठीच्या परीक्षेतील घोटाळाप्रकरणी गोकाक पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. हुबळी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
संजीव लक्ष्मण भंडारी (वय 24, मूळचा रा. अरभावी, सध्या रा. घटप्रभा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हुबळी येथील भेंडीगेरी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली आहे. अटकेची कारवाई पूर्ण करून त्याला गोकाक येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांसाठी पोलीस कोठडी दिली आहे.
55 केंद्रावर झाली परीक्षा
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली. 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 तसेच दुपारी 2 ते सायंकाळी 5 यावेळेत बेळगाव शहरातील 19, बैलहोंगल येथील 4, खानापूर येथील 3, रामदुर्ग येथील 4, सौंदत्ती येथील 4, चिकोडी येथील 8, गोकाक येथील 5, अथणी येथील 4, रायबाग येथल 4 अशा एकूण 55 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते.