कच्छचे उमेदवार वसंत वलजीभाई भाजपमध्ये सामील
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. कच्छ जिल्हय़ातील अबडासा मतदारसंघाच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आप उमेदवाराने स्वतःची उमेदवारी मागे घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सूरत पूर्वमधील कंचन जरीवाला यांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला होता. आम आदमी पक्षाने कच्छ जिल्हय़ातील अबडासा मतदारसंघात वसंत वलजीभाई खेताणी यांना तिकीट दिले होते, परंतु खेताणी यांनी भाजप उमेदवार प्रद्मुम्न सिंह जडेजा यांना समर्थन दर्शविले आहे.
वसंत वलजीभाई यांनी भाजप उमेदवाराला समर्थन देण्यासाठी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मी आम आदमी पक्ष सोडत आहे. राष्ट्रहित तसेच जनतेच्या हिताकरता भाजपमध्ये सामील होत आहे असे त्यांनी स्वतःच्या व्हिडिओत म्हटले आहे.
प्रद्युम्न जडेजा यांनी 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अबडासा मतदारसंघात विजय मिळविला होता. परंतु 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पोटनिवडणू होत जडेजा हे 36 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. अबडासा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते शक्तिसिंह गोहिल यांनीही केले आहे. काँग्रेसने यावेळी या मतदारसंघात मामदभाई जंग जट यांना उमेदवारी दिली आहे.
यापूर्वी सूरत पूर्व मतदारसंघातील आप उमेदवार कंचन जरीवाला यांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला होता. आपने भाजपवर कंचन यांचे अपहरण अन् दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. परंतु कंचन यांनी आपचे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. आम आदमी पक्षाला लोक राष्ट्रविरोधी अन् गुजरातविरोधी मानत असल्याने जनतेकडून समर्थन मिळत नव्हते असा दावा जरीवाला यांनी केला होता.