माजी आमदार कामिनी राठौड भाजपमध्ये सामील
देहगाम येथील काँग्रेसच्या माजी आमदार कामिनी बा राठौड यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कामिनी बा या 2012-17 पर्यंत आमदार होत्या, परंतु मागील निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अलिकडेच त्यांनी एक ध्वनिफित जारी करत काँग्रेस नेत्यांवर पैसे घेत उमेदवारी विकल्याचा आरोप केला होता.
काँग्रेस पक्ष केवळ 5 लोक मिळून चालवत आहेत. तिकिटासाठी पैसे मागितल्याची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली होती, परंतु कुठलीच कारवाई झाली नाही. अखेर भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे कामिनी राठौड यांनी म्हटले आहे.
गुजरात निवडणुकीत उमेदवारीच्या बदल्यात माझ्याकडून एक कोटी रुपये मागण्यात आले होते. असा आरोप त्यांनी केला आहे. कामिनी यांनी देहगाम मतदारसंघात 2012 साली विजय मिळविला होता. परंतु 2017 च्या निवडणुकीत त्यांना भाजपचे बलराज सिंह चौहान यांनी पराभूत केले होते.