आतापर्यंत लम्पिस्कीन रोगाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आठवर
सांबरा : तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लम्पिस्कीन रोगाने जनावरे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच असून मंगळवारी खणगाव खुर्द येथील एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे लम्पिस्कीन रोगाने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आठवर पोहचली आहे.
खणगाव खुर्द (ता. बेळगाव) येथील शेतकरी नागाप्पा मल्लाप्पा गिर्यालकर यांच्या बैलाला पंधरा दिवसांपूर्वी लम्पिस्कीन रोगाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांचा उपयोग न झाल्याने मंगळवारी पहाटे त्या बैलाचा मृत्यू झाला. नागाप्पा हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी गावातील आणखी एका शेतकऱयाबरोबर मिळून दोन बैल आणले होते. त्यापैकी एक बैल त्यांच्याकडे होता. त्या बैलाचा मृत्यू झाल्याने नागाप्पा यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. यातून सावरायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. संबंधित अधिकाऱयांनी नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी गिर्यालकर कुटुंबीयांनी केली आहे.