वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या विदेशी चलन साठय़ात पुन्हा एकदा घट झाली आहे. गेल्या आठवडय़ात परकीय चलन साठय़ामध्ये 4.5 अब्ज डॉलरची घट होऊन तो 528.37 अब्ज डॉलर या पातळीवर स्थिरावला. 24 जुलै 2020 पासूनची ही सर्वात मोठी घट आहे. आता भारताच्या तिजोरीत विदेशी चलन मालमत्तेमध्येही घट झाली असून ती 468.87 अब्ज डॉलर्स झाली आहे. या मालमत्तेत गेल्या आठवडय़ात 2.8 अब्ज डॉलरची घट झाली. रिझर्व्ह बँकेकडे असणारा सोन्याचा साठाही काही प्रमाणात घटला असून त्याची किंमत 37.45 अब्ज डॉलर्स इतकी राहिलेली आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही माहिती शनिवारी देण्यात आली.
अमेरिकेमध्ये तेथील मध्यवर्ती बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केल्याने अनेक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतविलेले डॉलर अमेरिकेमध्ये गुंतवण्यास प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे भारताने रुपया अधिक प्रमाणात घसरू नये यासाठी डॉलर विकण्याची प्रक्रिया सुरू केली. या दोन्ही घटकांमुळे विदेशी चलन साठा कमी झाला आहे. ही परिस्थिती आणखी सहा महिने टिकू शकते. त्यानंतर पुन्हा विदेशी चलन साठय़ात वाढ होण्याची संधी आहे. गेल्या आठवडय़ाच्या पूर्वीच्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात समाधानकारक वाढ दिसून आली होती. त्यामुळे समाधानाचे वातावरण होते. तथापि आता पुन्हा घसरण झाल्याने रिझर्व्ह बँकेचे विचारमंथन सुरू झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याचा परिणामही चलन साठय़ावर झाला.