अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सरकारकडून वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱया सर्वसामान्यांना खूषखबर दिली आहे. अल्पबचत योजनांवर मिळणाऱया व्याजदरात 30 बीपीएसपर्यंतची वाढ केली आहे. सरकारने वाढती महागाई आणि व्याजदरात होणारी वाढ पाहता गुरुवारी काही अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 30 आधार अंकांपर्यंत (बीपीएस) वृद्धी केली आहे. ही वृद्धी अलिकडेच अन्य व्याजदरांमध्ये झालेल्या वाढीच्या प्रमाणात समानता आणण्यासाठी करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी सरकारने केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात वाढ करत त्यांना खूषखबर दिली होती.
सरकारच्या निर्णयानंतर पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांचे व्याजदर बदलणार आहेत. पोस्ट ऑफिसमधील तीन वर्षांसाठीच्या मुदतठेवीवरील व्याजदर आता 5.5 टक्क्यांवरून वाढत 5.8 टक्के होणार आहे. ही वाढ चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीसाठी आहे.
योजनानिहाय व्याजदर
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीदरम्यान 7.4 टक्क्यांऐवजी आता 7.6 टक्के व्याजदर मिळणार आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर आता 7 टक्के असणार आहे. पूर्वी हे प्रमाण 6.9 टक्के होते. परंतु किसान विकास पत्र आता 124 ऐवजी 123 महिन्यांसाठी असणार आहे. यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱयांना अधिक नफा मिळणार आहे.
1-5 वर्षांपर्यंतच्या मुदतठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनसीएस), सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफवरील व्याजदरात कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. मासिक उत्पन्न खाते योजनेसाठी व्याजदर देखील 6.6 टक्क्यांवरून वाढवत 6.7 टक्के करण्यात आला आहे. सुमारे 27 महिन्यांनी पहिल्यांदाच अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे.
बचत योजना जुना दर नवा दर
- 3 वर्षांची मुदत ठेव 5.5 5.8
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना 7.4 7.6
- मासिक उत्पन्न खाते योजना 6.6 6.8
- पीपीएफ 7.1 7.1
- किसान विकास पत्र 6.9 7.0
- सुकन्या समृद्धी योजना 7.6 7.6