वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवामानाची माहिती देणारी खासगी कंपनी स्कायमेटने आणखी एका चक्रीवादळाची शक्यता वर्तविली आहे. फॅबियन नावाचे हे चक्रीवादळ अत्यंत शक्तीशाली असून ते हिंदी महासागरात आकाराला येत आहे. ते भारताच्या आणि बांगलादेशच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि मिझोराम या राज्यांमध्ये वेगाने वारे वाहू लागले आहेत. दक्षिण बंगालमध्ये या वादळामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला असून मिझोराममध्ये 236 घरांची हानी झाली आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे सोमवारी रात्री उशिरा वादळामुळे 25 झाडे पडल्याचे वृत्त आहे. या झाडांखाली थांबलेल्या सात कारगाड्या यामुळे नष्ट झाल्या आहेत. एका बाईकचीही हानी झाली आहे. काही भागात वीजप्रवाह खंडीत झाला असून वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. अद्याप हे वादळ सागर तटीय भागाला धडकलेले नाही. तरीही एवढी हानी झालेली असल्यामुळे प्रशासन सावध झाले असून आपत्कालीन सहाय्यता दलाला सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वादळाची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. तरीही पश्चिम बंगाल आणि ओडेशा या दोन राज्यांमध्ये सहा जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.