मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीची कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळय़ाप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने ‘चॅरिएट ऍडव्हर्टायझिंग’ कंपनीशी संबंधित राजेश जोशी यांना अटक केली आहे. गोवा निवडणुकीसाठी राजेश जोशी यांनी जाहिरात कंपनीच्या माध्यमातून 30 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. दिनेश अरोरा यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचा दावा केला जात असून ते ‘आप’चे विजय नायर यांच्यासोबत संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली मद्य घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी दिनेश अरोरा यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे सर्वजण सिसोदिया यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. ‘आप’ने दिल्लीतील मद्य घोटाळय़ाचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरल्याचा दावा गेल्या गुरुवारी ईडीने केला होता. तथापि, ईडीने आरोपपत्रात नमूद केलेला सर्व घटनाक्रम केवळ काल्पनिक आहे, असा प्रतिदावा आम आदमी पक्षाने केला आहे. हे सर्व आरोप पक्षाच्या प्रतिमेची हानी करण्यासाठी लावण्यात आले आहेत. ईडीचा उपयोग केंद्रातील सरकार भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी नव्हे, तर आमदारांच्या खरेदी-विक्रीसाठी करते. ईडीचे आरोपपत्र हास्यास्पद आहे, असेही म्हणणे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडले आहे.
फेसटाईम कॉलवरुन चर्चा
या घोटाळय़ातील एक आरोपी विजय नायर याने इंडोस्पिरिटस् नामक मद्यकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांची चर्चा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी घडवून आणली होती. ही चर्चा विजय नायर यांच्या फोनवरुन फेसटाईम व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केली गेली. विजय नायर हा आपल्या विश्वासातील असून त्याच्या संपर्कात आपण रहावे आणि त्याच्या समवेत काम करावे असा संदेश केजरीवाल यांनी महेंद्रू यांना दिला होता. त्यानुसार व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.