ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं आपापल्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क तर एकनाथ शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यातच एकनाथ शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा व्हिडिओ टीझरही शेअर केला केल्यांनतर ठाकरे गटाकडूनही मेळाव्याचा व्हिडिओ टीझर शेअर केला. आता पुन्हा एक व्हिडिओ टिझर शिंदे गटाकडून शेअर करण्यात आला आहे.(another teaser of Chief Minister Eknath Shinde released for dasara melava)
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, कोणत्याही भाषणाची सुरूवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या वाक्याने करायचे. त्यांच्या याच वाक्याचा वापर करत. तसेच, “शिवसैनिक हा बाजूला सारून मला शिवसेनाप्रमुख म्हणून मिरवता येणार नाही, ही माझी भावना आहे आणि ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे”, असे बाळासाहेब ठाकरेंच्या एका भाषणातील वाक्य वापरून नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या नव्या टीझरमध्ये बाळासाहेबांचे हिंदूत्वावरील भाषण दाखवण्यात आले आहे.
येत्या ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तसेच, वांद्र्यातील बीकेसी मैदानात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत. मात्र, या मेळाव्यापूर्वी दोन्ही गटात टीझर युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या दुसऱ्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या एका सभेतील भाषणाचा वापर करण्यात आला आहे. तसेच, या टीझरचा शेवटी “आम्ही विचारांचे वारसदार”, असे दाखवण्यात आले आहे.