Tarun Bharat

वर्ल्ड कपमधील दुसरा धक्कादायक निकाल

Advertisements

जपानचा चार वेळचे चॅम्पियन जर्मनीवर पहिला विजय, असानोचा गोल ठरला निर्णायक

वृत्तसंस्था/ दोहा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱया दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली असून बुधवारी झालेल्या गट ई मधील सामन्यात चार वेळचे चॅम्पियन जर्मनीला जपानने 2-1 अशा गोलफरकाने धक्का देत संस्मरणीय विजय नोंदवला. रित्सू डोअन व ताकुमा असानो यांनी जपानचे गोल नोंदवले. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू जर्मनीतील वेगवेगळय़ा क्लबकडून खेळत आहेत.. मंगळवारी सौदी अरेबियाने बलाढय़ अर्जेन्टिनाला धूळ चारली होती.

योगायोगाची बाब म्हणजे आशियाई संघांनीच या दोन बलाढय़ संघांना आपला हिसका दाखविला आहे. 32 व्या मिनिटाला इलके गुंडोगनने पेनल्टीवर गोल नोंदवून जर्मनीला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी कायम राखली होती. पण उत्तरार्धात जपानने आपला खेळ उंचावत सात मिनिटांच्या कालावधीत दोन गोल नोंदवत एका संस्मरणीय विजयाची नोंद केली. या दोन संघांत स्पर्धात्मक स्तरावर पहिल्यांदाच गाठ पडली होती. जपानला आजवर विश्वचषक स्पर्धेत एकही विजय मिळविता आलेला नव्हता. त्यांनी 7 सामने गमविले तर दोन सामने अनिर्णीत राखले होते. त्यामुळे विश्वचषकातील देखील त्यांचा हा पहिलाच विजय आहे. या विजयाचे त्यांना पूर्ण 3 गुण मिळाले.

एका गोलाने पिछाडीवर पडलेल्या जपानने 76 व्या मिनिटाला बरोबरी साधली. जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युअल न्युइयरने ताकुमी मिनामिनोचा फटका ब्लॉक केला. पण रिबाऊंड झालेल्या चेंडूला जबरदस्त अँग्युलर फटका मारत रित्सू डोअनने (जर्सी नं. 8) गोल करीत जपानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 83 व्या मिनिटाला ताकुमा असानोने चेंडूवर ताबा मिळाल्यानंतर निको श्लॉटरबेकला हुलकावणी देत जोरात आगेकूच केली आणि अगदी जवळून किंचित तिरकस फटक्यावर न्युइयरला चकवत चेंडू जाळय़ात टोलवल्यावर जपानच्या सर्वच खेळाडूंनी एकच जल्लोष सुरू केला.

वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची जर्मनीची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1982 मध्ये अल्जेरियाकडून व 2018 मध्ये मेक्सिकोकडून  त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनी वर्ल्ड कपमध्ये आजवर 13 सामने जिंकले तर चार सामने अनिर्णीत राखले आहेत. मागील विश्वचषक स्पर्धेत ते डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरले होते. पण साखळी फेरीतच त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. जपानची ही सातवी विश्वचषक स्पर्धा असून ते उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहेत.

येथील सामन्यात जर्मनीचेच बराच काळ वर्चस्व होते. त्यांनी 24 वेळा गोलपर्यंत धडक मारली तर जपानला 11 वेळा असे करता आले. पेनल्टीवर पहिला गोल दिल्यानंतर जपानचा गोलरक्षक शुइची गोन्डाने अनेकदा अप्रतिम गोलरक्षण करीत जपानवरील नामुष्की टाळली. जर्मनीचा पुढील सामना स्पेनविरुद्ध रविवारी होणार आहे तर जपानची लढत कोस्टारिकाशी होणार आहे.

Related Stories

अख्खा संघ गारद करण्याचा एजाझचा भीमपराक्रम!

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘रौप्य’

datta jadhav

टी-20 मालिकेत इंग्लंडची विजयी आघाडी

Patil_p

उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने हामझा निलंबित

Patil_p

ऑस्ट्रेलियात जोकोविच आठव्यांदा अजिंक्य

Patil_p

तामिळनाडू रणजी संघात बाबा इंद्रजितचा समावेश

Patil_p
error: Content is protected !!