हैदराबाद / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशातील गुंटूर जिह्यात तेलगू देसमचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभर राजकीय सभा घेत असलेल्या नायडूंच्या तेलगू देसम पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात लोकांना जीव गमवावा लागल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवडय़ातच बुधवारी चंद्राबाबूंच्या रोड शो दरम्यान नेल्लोर जिह्यात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. आता रविवारी सार्वजनिक सभेनंतर महिलांना भेटवस्तू म्हणून साडय़ांचे वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू असताना चेंगराचेंगरी होऊन तिघांचा मृत्यू झाला.