क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या केपे क्रीडा संकुल पाहणीवेळी घटना
वार्ताहर/ केपे
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासमोरच मंगळवारी सकाळी केपे मतदारसंघाच्या आजी-माजी आमदारांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली तसेच त्यांचे कार्यकर्तेही यावेळी जवळजवळ एकमेकांना भिडण्याचा प्रकार घडला. केपे क्रीडा संकुलामधील अनेक समस्या, वॉकिंग ट्रक यासंदर्भात पाहणी करण्याकरिता मंत्री गावडे हे सकाळी येथे आले होते.
यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता व त्यांचे कार्यकर्ते तसेच माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गोविंद गावडे हे संकुलात पोहोचताच त्यांनी आढावा घेण्यास व अधिकाऱयांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. तेव्हा आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी कोणत्या समस्या आहेत त्या सांगितल्यानंतर चंद्रकात कवळेकर यांनी मंत्री गावडे यांच्याशी बोलण्यास सुरुवात करताच देवेंद्र नामक व्यक्तीने कवळेकर यांनी बोलूच नये असा सूर लावला. कवळेकर यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही, त्यांनी गप्पच राहावे, असे ते मोठमोठय़ा आवाजात सांगू लागल्यानंतर तेथे असलेले केपे पालिकेचे नगरसेवक दयेश नाईक यांनी हस्तक्षेप करत कवळेकर यांना का बोलण्याचा अधिकार नाही, असा प्रश्न केला.
मंत्री फळदेसाई, गावडे यांनी केला हस्तक्षेप
त्यासरशी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होण्याबरोबर आजी-माजी आमदारांच्या इतर कार्यकर्त्यांमध्येही शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. त्याशिवाय मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर आमदार डिकॉस्ता व कवळेकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू होऊन ती बराच वेळ चालली. त्याचवेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई तेथे पोहोचले. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला.
हे प्रकरण ताणू नये याकरिता मंत्री गावडे यांच्याबरोबरच्या अधिकाऱयाने पोलीस स्थानकावर संपर्क साधला. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटाही घटनास्थळी पोहोचला. मंत्री गावडे यांनी मध्यस्थी करून डिकॉस्ता व कवळेकर यांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. वाद मिटवल्यावर त्यांनी राहिलेल्या संकुलाची पाहणी केली व येथे ज्या कमतरता आहेत त्या दूर करताना सर्व काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले.
सर्व समस्या सोडवू ः गावडे
स्थानिक आमदारांनी या संकुलात अनेक समस्या असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही पाहणी केली. येथील समस्या या तशा मोठय़ा नाहीत. मात्र त्याकडे वेळीच लक्ष दिले नसल्याने, समन्वय नसल्याने या समस्या मोठय़ा बनल्या आहेत. यात जिम, जलतरण तलावासंबंधीच्या ज्या समस्या आहेत या सर्व सोडविल्या जातील, असे क्रीडामंत्री गावडे यानी सागितले. तसेच निवडणुकीच्या वेळी येथील जागेचा वापर केला जात असल्याने युवकांना, मुलांना संकुल बंद राहत असते व त्यांची गैरसोय होत असते. अशी गैरसौय होऊ नये याकरिता नि˜ाडणूक प्रकिया केपे कॉलेजच्या जागेत राबवावी असे उपजिल्हाधिकाऱयांना सांगितलेले आहे, असे गावडे यांनी सागितले
अधिकाऱयांनी वेळच्या वेळी कामे करावीत ः डिकॉस्ता
सुरुवातीला दोन महिन्यांत सर्व समस्या सोडविल्या जातील असे सांगण्यात आले होते. मात्र आता सहा महिने उलटले, तरी 13 पैकी एकच काम झाले आहे. शेवटी केपेच्या जनतेला आम्ही उत्तर द्यावे लागते. त्यामुळे अधिकाऱयांनी मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत कामे वेळच्या वेळी पूर्ण करावीत, असे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सागितले. आजी-माजी आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची हा केपे परिसरात मंगळवारी चर्चेचा विषय बनला. यापूर्वीही बेतूल येथील पंचायतघरावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.