Tarun Bharat

अन्शू मलिकची सुवर्णपदकाकडे वाटचाल

मनीषा कांस्यपदकाच्या फेरीत

वृत्तसंस्था/ उलानबातार

येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अन्शू मलिकने महिलांच्या 57 किलो वजन गटात अंतिम फेरी गाठत सुवर्ण मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. 62 किलो वजन गटात मनीषा कांस्यपदकासाठी लढत देणार आहे. पहिल्या दोन दिवसांत झालेल्या ग्रीको रोमन प्रकारात भारतीय मल्लांनी 5 कांस्यपदके पटकावली.

विद्यमान विजेत्या असलेल्या 20 वर्षीय अन्शू मलिकने जबरदस्त प्रदर्शन करीत आपल्या वजन गटातील तीनही लढती तांत्रिक सरसतेच्या आधारे जिंकत अंतिम फेरी गाठून तिसरे आशियाई पदक जिंकण्याच्या दिशेने आगेकूच केली. 2020 मध्ये तिने मायदेशात झालेल्या स्पर्धेत कांस्य जिंकले होते. त्यानंतर गेल्या वर्षी अलमाटी येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठत असा पराक्रम करणारी भारताची पहिली महिला मल्ल होण्याचा मान तिने मिळविला आहे.

येथील स्पर्धेत तिने पहिल्या लढतीत उझ्बेकिस्तानच्या शोखिदा अखमेडोव्हाचा पराभव केल्यानंतर दुसऱया फेरीत सिंगापूरच्या डॅनियली स्यू चिंग लिम हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. अन्शूने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याचा व डाव रचण्याचा विचार करण्यासाठी जराशीही संधी दिली नाही. एकामागोमाग एक डाव रचत तिने प्रतिस्पर्ध्यांना गोंधळून टाकले होते. उपांत्य फेरीत तिने मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखूचा पराभव केला. चार गुणांच्या थ्रोने सुरुवात केल्यानंतर डबललेग ऍटॅक करीत दोन मिनिटे 12 सेकंदात लढत संपवली.

62 किलो वजन गटात चांगली कामगिरी करीत असलेल्या मनीषाने उपांत्य फेरीत केवळ 40 सेकंदात जपानच्या नोनोका ओझाकीकडून पराभव स्वीकारला. त्यामुळे तिचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. ओझाकीने तिच्यावर लेग ऍटॅक करीत झटपट लढत संपवली. त्याआधी मनीषाने कझाकच्या आयाउलीम कॅसीमोव्हावर 9-0 असा एकतर्फी विजय मिळवित सुरुवात केली होती. तिची कांस्यपदकाची लढत कोरियाच्या हानबित ली हिच्याशी होणार आहे. दरम्यान, 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेला पहिल्या दोन्ही लढतीत तांत्रिकतेच्या आधारे पराभव स्वीकारावा लागल्याने पदकाच्या शर्यतीत ती येऊ शकली नाही.

त्याआधी गुरुवारी, भारताच्या सरिता मोर व सुषमा शोकीन यांनी कांस्यपदके मिळविली. सरिता ही 59 किलो गटातील विद्यमान चॅम्पियन होती. पण तिला तशा कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. मात्र पाच स्पर्धकांचा समावेश असलेल्या या गटात ती कांस्य पटकावण्यात यशस्वी ठरली. तिला पहिल्या दोन लढतीत पराभव स्वीकारावे लागले. मंगोलियाच्या शूवदोर बातारजावने तिला 2-1 असे तर जपानच्या सारा नातामीनेही तिला हरविले. मात्र नंतरच्या दोन लढती जिंकून तिने पुनरागमन केले. तिने प्रथम उझ्बेकच्या दिलफुजा एम्बेटोव्हावर तांत्रिक सरसतेवर आणि नंतर डायना कयुमोव्हावर 5-2 असा विजय मिळविला.

सुषमाने 55 किलो गटात जपानच्या उमी इमाइकडून पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱया लढतीत कझाकच्या अल्टीन शागायेव्हावर 5-0 असा विजय मिळविला. नंतरच्या फेरीत तिने उझ्बेकच्या सर्बिनाझ जिएनबायेव्हावर चितपट विजय मिळविला. मात्र नंतरच्या फेरीत तिला स्थानिक खेळाडू ओ. गनबातारकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला. पण दोन विजयामुळे तिचे कांस्यपदक निश्चित झाले. 50 किलो गटात मनीषाला पदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली तर सोनिका हुडा (68 किलो) व सुदेश कुमारी (76 किलो) या पदकाच्या लढतीत पोहोचू शकल्या नाहीत.

Related Stories

NZvsIND : भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की

tarunbharat

पहिल्या वनडेत इंग्लंडचा आयर्लंडविरुद्ध विजय

Patil_p

फक्त 70-80 जणांनी प्रत्यक्ष पाहिला सलामीचा सामना!

Patil_p

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘रणजी’ला आजपासून प्रारंभ

Patil_p

श्रीकांत, सेन, प्रणॉय यांना कठीण ड्रॉ

Patil_p

कर्णधार ब्रेथवेट शतकाच्या समीप, विंडीज 7 बाद 287

Patil_p