पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेची उत्तरसूची आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या चारही संचाची उत्तरसूची या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयोगामार्फत 30 एप्रिल रोजी गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा राज्यभरात पार पडली. या परीक्षेला 4 लाख 65 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेचे प्रवेशपत्र समाजमाध्यमावर एक आठवडा अगोदर प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार निर्विघ्नपणे पार पडली.
उत्तरसूचीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन हरकती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हरकत नोंदविण्याची अंतिम मुदत 7 मेपर्यंत राहील. हरकत नोंदविताना तांत्रिक अडचण आल्यास आयोगाच्या टोल फ्री क्रमांक अथवा ईमेल आयडीवरून आवश्यक मदत पुरविण्यात येईल, असे आयोगाकडून कळविण्यात आले.