आसिलता राजे यांचे प्रतिपादन : मुंबईत लोकमान्य सोसायटीतर्फे ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शन
प्रतिनिधी /मुंबई
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी सुरू झाली असून सुदैवाने आपण सर्वजण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. याच स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची हीच वेळ आहे. प्रत्येकाने भ्रष्टाचाराविरोधात वैयक्तिक पातळीवर लढले पाहिजे. त्यासाठी स्वतःमध्ये बदल करून घेतला पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात आसिलता राजे यांनी केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे मुंबईत ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
आसिलता राजे म्हणाल्या, लोकमान्य सोसायटीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशासाठी सर्वस्व बलिदान करणाऱया 405 क्रांतिकारकांचे माहितीसहित फोटो प्रदर्शन सुरू केले आहे. हे चित्रप्रदर्शन उत्कृष्ट असून प्रत्येक पिढय़ांनी आवर्जुन पाहावे असे आहे. लोकमान्य सोसायटीने हे चित्रप्रदर्शन सामाजिक बांधिलकीतून सुरू केले आहे. स्वातंत्र्यवीर यांचे चरित्र वर्णन केले. भगूर-नाशिक मधून कार्याला सुरुवात, पिस्तुलाची पाठवणी पुढे जॅक्सनच्या खुनात स्वातंत्र्यवीरांना अटक, अंदमानची शिक्षा, रत्नागिरीतील कैद, स्थानबद्धता अशी शौर्यकथा त्यांनी सांगितली. मात्र त्याचवेळी स्वातंत्र्यवीरांनी कैद्यांमध्ये स्वातंत्र्यासाठी जागफती केली. जात-पात मोडीत काढून पतित पावन मंदिराची स्थापना केली. यातून स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, लेखक, हिंदू तत्त्वज्ञ अशा अनेक चळवळींचे प्रणेते होते, असेही त्यांनी सांगितले.
हे चित्रप्रदर्शन पाहण्यास इतिहासोत्सुक नागरिकांनी उपस्थिती लावली. स्वातंत्र्याची चित्रगाथा प्रदर्शन मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे दि. 9 ते 11 असे तीन दिवस राहणार आहे. तरुणाईला देशभक्तीची प्रेरणा देणारी ही चित्रगाथा पाहण्याचे आवाहन ‘लोकमान्य’च्यावतीने केले आहे. अकोल्याचे जयंत सहस्त्रबुद्धे यांनी आयुष्यभर भ्रमंती करून संपूर्ण भारतातील क्रांतिकारकांची माहिती व छायाचित्रांचे संकलन केले असून या प्रदर्शनात क्रांतिकारकांची नावे आणि माहिती दिली आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ठाणे मुलुंड, पनवेल येथेदेखील हे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी लोकमान्य सोसायटीचे मुंबई रिजनल मॅनेजर रमेश शिरसाट, सिनियर मॅनेजर अतुल परब, राजू नाईक, उज्ज्वला देसूरकर, मुंबई रिजनल ऑफिस, दादर, प्रभादेवी, नायगाव आदी ब्रँचमधील अधिकारी तसेच कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते.
‘लोकमान्य’चे व्यवहार पारदर्शी
सतत सामाजिक उपक्रम राबविणाऱया लोकमान्य मल्टिपर्पज या संस्थेने प्रदर्शित केलेल्या चित्रगाथेबद्दल आम्ही भारतीय आभार मानत आहोत. ‘लोकमान्य’चे व्यवहार पारदर्शी असून येथे येण्यास कोणतीही भीती वाटत नाही. मी या संस्थेशी 9 वर्षांपासून जोडला गेलो आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.
– अजय कदम, ठेवीदार, लोकमान्य सोसायटी.