20 किलो प्लास्टिक जप्त, 11 हजाराचा दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गसूचीनुसार प्लास्टिकबंदी कारवाई करण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनानेदेखील सुरुवात केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॅन्टोन्मेंटच्यावतीने बुधवारी काही ठिकाणी प्लास्टिकविरोधी मोहीम राबविली. यावेळी 20 किलो प्लास्टिक जप्त करून 11 हजार रुपये दंड वसूल केला.
सिंगलयूज प्लास्टिक वापरण्यावर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. सिंगलयूज प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषणात वाढ झाली असून यावर नियंत्रण आणण्यासाठी प्लास्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेने प्लास्टिकबंदी मोहीम राबून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण कॅन्टोन्मेंट परिसरात प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॅन्टोन्मेंटच्यावतीने प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात आली. रेल्वेस्टेशन आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सिंगलयूज प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. विविध दुकानांमध्ये सिंगलयूज प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. प्लास्टिक वापरण्यात येऊ नये, असे आवाहन करूनही प्लास्टिकचा वापर कमी झालेला नाही. त्यामुळे व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला. बुधवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जगदीश एच. आय. व कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळूकर तसेच अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.