जन्मदिनी आयोजित सभेला विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती ः नेतृत्व करण्याचे दिले संकेत
@ वृत्तसंस्था / चेन्नई
द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी स्वतःच्या जन्मदिनी (बुधवारी) विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत स्वतःच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडविले आहे. द्रमुकच्या सभेत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थित राहत एकजुटीचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.
भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे. आमच्या विविधतेचे रक्षण केले तरच आम्ही एकतेचे रक्षण करू शकतो. याचमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताला एकजूट करण्याचा प्रयत्न चांगली सुरुवात आहे. विरोधी पक्ष आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही सर्वजण एकजूट झालो आणि जिंकलो तर या देशाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात चांगला नेता कोण हे ठरविले जाईल. स्टॅलिन देखील पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात असे फारुख अब्दुल्लांनी म्हटले आहे.
कोण पंतप्रधान होणार हा मुद्दा बाजूला ठेवून प्रथम आम्ही 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकूया असे अब्दुल्ला म्हणाले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भूमिका मांडली आहे. समान विचारसरणी असलेल्या विरोधी पक्षांनी विभाजनकारी शक्तींच्या विरोधात एकत्र यावे. कोण नेतृत्व करणार आणि कोण पंतप्रधान होणार याबद्दल मी कधीच बोललेलो नाही. आम्ही एकजूट होऊन लढू इच्छितो आणि हीच आमची इच्छा असल्याचे उद्गार खर्गे यांनी काढले आहेत.
तामिळनाडूत काँग्रेस-द्रमुक आघाडीने 2004, 2009 मध्ये लोकसभा आणि 2006 तसेच 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. आम्ही संपुआसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयावरून स्वतःची आघाडी अन् नेतृत्व मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवू. भाजप सरकारच्या अपयशामुळेच 23 कोटीहून अधिक लोक दारिद्रय़रेषेखाली पोहोचले आहेत. सर्वसामान्य लोक महागाईने त्रस्त आहेत, तर तरुण-तरुणी बेरोजगारीमुळे प्रभावित झाल्या आहेत. परंतु भाजप निवडणुकीतील विजयाकरता समाजात ध्रूवीकरण घडवून आणू पाहत असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.
देशाचा मुख्य अजेंडा बेरोजगारी, महागाई, लोकशाहीवरील आक्रमण आणि सर्व घटनात्मक संस्थांवरील कब्जाचा आहे. भाजप सरकार घटनेचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. लालूप्रसाद यादव यांनी ही आणीबाणी नव्हे तर अघोषित आणीबाण असल्याचे नेहमीच म्हटले आहे. याचमुळे आम्ही सर्वांनी एकत्र येत लढण्याची गरज आहे. आम्ही भाजपला पराभूत करू शकतो आणि हे काही मोठे काम नसल्याचे उद्गार बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काढले आहेत.
अखिलेश यांचीही हजेरी
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची प्रशंसा केली. स्टॅलिन हे राष्ट्रीय स्तरावर प्रमुख नेते म्हणून उदयास येतील. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या विकासासाठी उत्तम कामगिरी केली आहे. अन्य नेत्यांसोबत आगामी पिढय़ांना न्याय मिळवून देण्यासाठी मी काम करणार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.