पाकिस्तानातील घटना ः 24 तासांपासून अधिकारी ओलीस ः एकाची हत्या
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील बन्नू जिल्हय़ात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या 30 दहशतवाद्यांनी दहशतवादविरोधी केंद्रावरच कब्जा केला आहे. दहशतवाद्यांनी अनेक पोलीस अधिकाऱयांना ओलीस ठेवले तर एकाची हत्या केली आहे. या घटनेला 24 तास उलटल्यावरही पाकिस्तानचे सरकार स्वतःच्या अधिकाऱयांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवू शकलेले नाही.
टीटीपीच्या दहशतवाद्यांनी कब्जा केलेले दहशतवादविरोधी केंद्र हे अफगाणिस्तानच्या सीमेपासून नजीक आहे. पोलीस अधिकाऱयांची मुक्तता करविण्यासाठी राबविण्यात आलेली एक मोहीम अपयशी ठरल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला चहुबाजूने घेरले आहे. पाकिस्तानचे प्रशासन चर्चेच्या माध्यमातून अधिकाऱयांची सुटका करवू पाहत आहे. पोलीस अधिकाऱयांच्या मुक्ततेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी सरकारसमोर एक अट ठेवली आहे. सरकारने सुरक्षितपणे अफगाणिस्तानात जाऊ द्यावे अशी मागणी या दहशतवाद्यांनी केली आहे.
दहशतवादविरोधी केंद्रावरील टीटीपीच्या कब्जाची सुरुवात एका दहशतवाद्याच्या चौकशीदरम्यान झाली. चौकशीदरम्यान दहशतवाद्याने पोलिसाच्या हातातील बंदूक हिसकावून स्वतःच्या सहकाऱयांची सुटका करवून घेतली. पाहता-पाहता सर्व 30 दहशतवाद्यांनी पूर्ण केंद्रावर कब्जा केला आणि अधिकाऱयांना ओलीस ठेवले.
दहशतवाद्यांची मनधरणी करण्यासाठी अफगाणिस्तानातील त्यांच्या म्होरक्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दहशतवाद्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबत संभाषण घडवून आणले गेल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते मोहम्मद अली सैफ यांनी दिली आहे. चर्चेतून कुठलाच निष्कर्ष न निघाल्यास पाकिस्तानचे सैन्य पूर्ण दहशतवादविरोधी केंद्राला उद्ध्वस्त करणार असल्याचे मानले जात आहे.