वृत्तसंस्था/ हरारे
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत अफगाणने विजयी सलामी देताना शनिवारच्या पहिल्या सामन्यात यजमान झिंबाब्वेचा 6 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात अफगाणच्या नजिबुल्लाह झेद्रनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 159 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणने 19.2 षटकांत 4 बाद 160 धावा जमवित विजय नोंदविला. झिंबाब्वेच्या डावात सिकंदर रझाने 45 तर वेस्ले मधेवेरेने 32 जमविल्या. सलामीचा केया सहा धावांवर बाद झाला. मधवेरे आणि कर्णधार एर्वीन यांनी 30 धावांची भागिदारी केली. एर्वीनने 9 तर चकब्वाने 29 धावा जमविल्या. अफगाणतर्फे निजात मसूदने 39 धावांत 3 तर फारूकी, रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हजरतुल्लाह झेझाई आणि गुरबाज या सलामीच्या जोडीने 10 षटकांत 83 धावांची भागिदारी काली. झेझाईने 45 तर गुरबाजने 33 धावा जमविल्या. अफगाणला शेवटच्या चार षटकांत 54 धावांची जरूरी होती आणि त्यांची स्थिती 17.2 षटकांत 4 बाद 134 अशी होती. अफगाणला शेवटच्या 16 चेंडूत विजयासाठी 26 धावांची गरज होती. त्यांच्या नझिबुल झेद्रनने नाबाद 44 तर नबीने नाबाद 15 धावा जमवित हा सामना चार चेंडू बाकी ठेवून जिंकला.
संक्षिप्त धावफलक
झिंबाब्वे 20 षटकांत 8 बाद 159 (सिकंदर रझा 45, मधेवेरे 32, निजात मसूद 3-39), अफगाण 19.2 षटकांत 4 बाद 160 (झेझाई 45, एन.झेद्रन नाबाद 44, नबी नाबाद 15,गुरबाज 33, बुरी 3-14).