रशियाचे विदेश व्यवहारमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी हिटलरबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी क्षमायाचना केली आहे, असे वृत्त इस्त्रायलच्या वृत्तसंस्थेने दिले आहे. जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर हा ज्यू रक्ताचा असण्याची शक्मयता आहे, असे विधान करून लाव्हरोव्ह यांनी ज्यूंच्या भावना काही दिवसांपूर्वी दुखावल्या होत्या. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे संतप्त पडसाद जगभरातील ज्यू समाजामध्ये उमटले होते.
ऍडॉल्फ हिटलरने दुसऱया महायुद्धाच्या कालखंडात लक्षावधी ज्यूंची निर्घृण हत्याकांडे घडविली होती. त्यामुळे ज्यू समाजाचा आजही हिटलरवर राग आहे. असा हिटलर ज्यू रक्ताचा होता, असे विधान लाव्हरोव्ह यांनी केल्यामुळे जगातील तीन कोटी ज्यूंचा अपमान झाला आहे, असे इस्त्रायलने वक्तव्य केले होते. जगभरातून दबाव वाढल्यामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी लाव्हरोव्ह यांच्या बेजबाबदार विधानाबद्दल ज्यू समाजाची क्षमायाचना केली आहे, असे इस्त्रायलचे म्हणणे आहे. इस्त्रायलचे विदेश व्यवहारमंत्री यायिर लापिड यांनी लाव्हरोव्ह यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला होता. हे विधान अवमानजनक असून त्याचा जाब रशियाला विचारला जाईल. रशियाच्या अध्यक्षांनी वेळीच ज्यू समाजाची क्षमायाचना करावी, अशी सूचनाही लापिड यांनी केली होती.