मिरवणूक वेळेत सुरू करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांनी आपल्या कार्यालयात शिवजयंती चित्ररथ महामंडळांच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली. वेळेत मिरवणूक सुरू करण्याचे आवाहन यावेळी पोलीस अधिकाऱयांनी केले.
मिरवणूक, देखावे, जिवंत देखावे, डॉल्बी आदी विषयांवर पोलीस अधिकाऱयांनी पदाधिकाऱयांकडून माहिती घेतली. चित्ररथ महामंडळाकडील नोंदीनुसार मिरवणुकीत 72 मंडळे सहभागी होणार आहेत. यापैकी 12 मंडळांनी डॉल्बीची तयारी केली आहे. यंदा अधिकाधिक मंडळांनी जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे.
यावेळी खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, जे. बी. शहापूरकर, प्रसाद मोरे, आदित्य पाटील, रोहन जाधव, अनंत बामणे आदी उपस्थित होते. पोलिसांनी जिवंत देखावे सादर करण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. यासंबंधी बैठकीत माहिती देण्यात आली.