आता द्यावे लागणार 49 हजार 900 रुपये : इतर मॉडेलच्या किंमतीही वाढल्या
वृत्तसंस्था /मुंबई
आयफोन निर्माती कंपनी ऍपलने आपल्या आयफोन एसई 2022 फोनची किंमत भारतामध्ये 6000 रुपयांनी वाढविल्याचे समजते. त्यामुळे हा फोन नव्या ग्राहकांसाठी आता महाग झाला आहे.
ग्राहकांना सदरचा स्मार्टफोन खरेदी करावयाचा असल्यास अतिरिक्त 6000 रुपयांची रक्कम खर्च करावी लागणार आहे. कंपनीने सुरुवातीला हा स्मार्टफोन सादर केला तेव्हा त्याची किमत 43,900 रुपये होती. आता या स्मार्टफोनची किंमत वाढून 49,900 रुपये इतकी (64 जीबी मॉडेल करिता) झाली आहे. याच गटातील इतर स्मार्टफोनची किमतही वाढविण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
काय आहेत वैशिष्टय़े
आयफोन एसइ-2022 हा 4.7 इंचाच्या एचडी रेटिना डिस्प्ले स्क्रीनसह असून यात ए 15 बायोनिक चिपसेट असेल. 4 जीबी रॅमसह 64 जीबी, 128 जीबी किंवा 256 जीबी स्टोरेजसह हा फोन उपलब्ध आहे. 12 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा व 7 मेगापिक्सलचा पंट कॅमेरा यात आहे.