भारतामध्ये 13 आयफोन होणार तयार : फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये होणार निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील आयफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणाऱया ऍपलने भारतामध्ये आयफोन-13 चे उत्पादन सुरु केले आहे. सदरचे उत्पादन हे मॅन्युफॅक्चरिंग चेन्नईजवळील श्रीपेरंबुदूर येथे असणाऱया जगातील सर्वात मोठय़ा कॉन्ट्रक्ट मॅन्युफॅक्चर कंपनी फॉक्सकॉनच्या कारखान्यात सुरू असल्याची माहिती ऍपल इंडियाच्या प्रवक्त्यांनी एका इमेलमधून दिली आहे.
फॉक्सकॉन-विस्ट्रॉनची घेणार मदत
आयफोन 13 च्या निर्मितीसाठी कंपनी आता आपल्या फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन यांची मदत घेणार आहे. यासोबतच आपल्या सर्व टॉप विक्री मॉडेलची निर्मिती करणार आहे. यामध्ये तिसरा भागीदार पेगाट्रोनमध्ये या महिन्यात उत्पादन सुरु होण्याचे संकेत आहेत. याठिकाणी आयफोन 12 ची निर्मिती होण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉन येथे ऍपलसाठी आयफोनची निर्मिती केली जाते. चेन्नई येथील प्रकल्पात जानेवारी महिन्यापासून 13 चे उत्पादन सुरु केले आहे.
ऍपलचा देशातील प्रवास दोन दशकापासून
आयफोन 13 हे मॉडेल आधुनिक 5-जीचा अनुभव देणारे असून ए15 बायोनिक चिप, दीर्घ कालावधीपर्यंत चालणारी बॅटरी आदी सुविधा मिळणार आहेत. मात्र भारतामध्ये ऍपलचा प्रवास हा जवळपास 20 वर्षांपूर्वी सुरु झाला आहे. तसेच ऍपलने सप्टेंबर 2020 मध्ये आपले ऑनलाईन स्टोअर सुरु केले होते.