केंद्रातील भाजपवर गोव्यात आरोपांच्या फैरी
पणजी : केंद्रात ज्यावेळी काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी देशातील सर्व उद्योजकांना समान न्याय व वागणूक मिळत होती. त्यावेळी काँग्रेसवर कोळसा घोटाळ्याचा आरोप करणारे भाजप सरकार हे किती खोटारडे आहे, हे आज दिसून येत आहे. कारण उद्योगपती गौतम अदानीला फायदा करून देण्यासाठी आपली खिसे भरण्यासाठी भाजप सरकार वावरत आहे. एकट्या गौतम अदानीसाठी पूर्ण भारतातील जनतेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेठीस धरत आहे. 2014 पूर्वी गौतमी अदानी हे उद्योगपतींमध्ये 690 व्या स्थानावर होते. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर झपाट्याने त्यांच्या उद्योगात वाढ होत ते आता जगात दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. हे भाजपचे छुपे राजकारण असून, अदानीच्या मालमत्तेची आणि त्यांच्या व्यावसायातील प्रगतीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डाटा विश्लेषक प्रवीण चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत केली. पणजी येथील गोवा प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उत्तर गोवा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अर्चित नाईक, दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर व कुडतरीचे काँग्रेस नेते ऑलेन्सियो सिमॉईस उपस्थित होते.
प्रवीण चक्रवर्ती म्हणाले, अदानी यांनी गेल्या आठ वर्षात भाजपमुखे बेसुमार संपत्ती वाढवली आहे. जी 2008 मध्ये केवळ सहा अब्ज डॉलर इतकी होती. ती आता जवळपास 150 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली आहे. 2014 नंतर सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अवघ्या सात वर्षांत अदानी दुसऱ्या क्रमांकावर कसे आले. देशातील प्रत्येक वाट्यात अदानी याचा समावेश आहे. शेअर मार्केट असू द्या किंवा परदेशातही अदानी यांनाच कसे काय कॉन्ट्रॅक मिळते. याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण हे केवळ एकट्या अदानीच्या फायद्यासाठी आहे. आज विमानतळ असू द्या, सर्वात मोठा वीज जनरेटर विमानतळ उभारण्यातही मोदीच मदत करत आहेत. अगदी सफरचंदचा सर्वात मोठा वितरक म्हणूनही अदानी यांचे नाव घेतले जात आहे. डेटा स्टोरेजमध्ये मोठा सहभाग, संरक्षण उपकरणे आणि राष्ट्रीय सुरक्षा. सिमेंटचा सर्वात मोठा उत्पादक, रस्ते प्रकल्प या सर्वात अदानी हेच उद्योगपती कसे काय असू शकतात हा विचार करण्याची वेळ आल्याचे चक्रवती म्हणाले.
देशात मोदी नव्हे; अदानी सरकार
केंद्रात भाजपचे सरकार आहे, असे सांगितले किंवा बोलले जात असले तरी हे सर्व खोटे आहे. कारण नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठीच वावरत आहेत. अदानी यांना फायदा करून देण्यात पंतप्रधान माहीर असून, ते एकट्या अदानीसाठी देशातील पूर्ण जनतेस वेठीस धरत आहेत. 609 या क्रमांकावर जगात दुसऱ्या क्रमांकावर अदानी यांनी घेतलेली मजल यावर लोकसभेत राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले असतानाही त्याचे उत्तर दिले जात नसल्याने अदानी यांच्या प्रगतीची व देशातील सर्व उद्योगांत त्यांनाच मिळणारा वाटा याविषयी चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय चौकशी नेमावी, अशी मागणी चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत केली.
गोव्यातही अदानीच्याच फायद्याचा विचार
गोव्यात आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ उभारताना गौतम अदानी याच्या फायद्याचाच अधिक विचार करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील भाजप सरकारने मनोहर पर्रीकर असे पूर्ण नाव मोपा विमानतळाला दिलेले नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी केला. ते म्हणाले, गोवा सरकारने वास्कोतील पोर्ट व इतर किनारी भाग उद्योगपती अदानी यांना केव्हाच दिलेले आहेत. या ठिकाणीही अदानी केव्हाही आपला दावा सिद्ध करू शकतो, अशी शंकाही पाटकर यांनी व्यक्त केली.