नवी दिल्ली
सरकारने वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार मंडळामध्ये (बीओटी) विविध क्षेत्रातील जवळपास 29 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
व्यापार मंडळ उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ सादर करणार आहे. यामध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील भागीदार, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱयांचा समावेश होणार आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार निर्यात व आयातीला चालना देण्यासाठी सर्व भागधारकांशी सल्लामसलतीची प्रक्रिया अधिक सुसंगत करण्यासाठी सरकारने वर्ष 2019 मध्ये व्यापार विकास आणि प्रोत्साहन परिषदेचे व्यापार मंडळामध्ये विलीनीकरण करण्यात आले होते.
नवीन अशासकीय सदस्यांमध्ये राजेश गोपीनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, संजय नय्यर, अध्यक्ष, केकेआर इंडिया आणि ओम प्रकाश मित्तल, कार्यकारी सदस्य, लघू उद्योग भारती यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पंकज महिंद्रा, अध्यक्ष इंडिया सेल्यूलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन, आरएस सोधी, व्यवस्थापकीय संचालक, जीसीएमएमएफ(अमूल) आणि अरुण मंडल, सीईओ, विधान नगर अननस विकास ट्रस्ट, पश्चिम बंगाल यांचा देखील समावेश आहे.
अधिकृत सदस्यांमध्ये समावेश असणारे
सदरच्या मंडळात अधिकृत सदस्यांमध्ये समावेश असणाऱया व्यक्तीमध्ये नितीआयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे(सीबीआयसी) अध्यक्ष, महसूल, आरोग्य आणि कृषी विभागांचे सहसचिव यांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये उद्योग मंडळाचे प्रतिनिधीही सदस्य आहेत.