धर्मादाय सहआयुक्तांचे आदेश; ट्रस्टचे विश्वस्तांसह सदस्य अपात्र
कोल्हापूर, वारणानगर- प्रतिनिधी
कोडोली (ता. पन्हाळा) ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च कोल्हापूर या संस्थेवर धर्मादाय सह आयुक्तांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी जारी केले असून धर्मादाय उपआयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या विश्वस्तांसह सदस्यांना अपात्र ठरविले आहे.
ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्चच्या ट्रस्टच्या कारभाराविषयी तक्रारी आल्यानंतर धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांच्यापुढे 41 डी अंतर्गंत सुनावणी झाली. सुनावनीदरम्यान ट्रस्टच्या कारभारातील अनियमितता पुढे आली. सह आयुक्त हेर्लेकर निर्णय देताना सर्व विश्वस्त व सदस्य यांना कायमचे अपात्र ठरविले असून या सर्वांचे अधिकार काढून घेतले आहे. त्यांना या संस्थेत कुठल्याही प्रकारचे काम करण्यास व निर्णय घेण्यास बंधन घातले आहे. प्रशासक म्हणून धर्मादाय उप आयुक्त प्रदीप चौधरी यांनी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून, त्याचा अहवाल दर पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकाचे कामकाज करत असताना चौधरी यांना सहाय्यक म्हणून या कार्यालयातील निरीक्षक गणेश ठोकळे यांची मदत घ्यावी, असे आदेशामध्ये नमुद केले आहे.
2013 मध्ये चौकशीची मागण
आमोस सालेमन काळे (रा. बेथेलनगर, कोडोली) यांनी 2013 मध्ये ख्रिश्चन प्रेसबिटेरीअन चर्च ट्रस्टची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर 2016 मध्ये निकालही लागला होता. त्यामध्ये ट्रस्टींना प्रलंबित बदल अर्ज व हिशेब पत्रक दाखल करण्याचे आदेश झाले होते. पण या आदेशानुसार बदल अर्ज व हिशेब पत्रके दाखल केली नसल्याने तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्याने प्रशासक नियुक्तीसह विश्वस्त, सदस्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात आली.