प्रतिनिधी /मडगाव
प्रत्येक जबाबदारी ही उत्तरदायित्वासह येते असे आपण मानतो. लोकशाही आणि गोव्याची अस्मिता जपण्यासाठी समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करणार आहे. सर्व विरोधी आमदारांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया स्वीकारेन व सर्वांना बरोबर घेऊन गोमंतकीयांचा आवाज बुलंद करणार आणि सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्रखर विरोध करणार, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
काल शुक्रवारी सभापती रमेश तवडकर यांनी युरी आलेमाव यांच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी हे एक आव्हानात्मक काम आहे याची आपणास जाणीव आहे. आपण कर्तव्य बजावताना घटनातज्ञ, माजी आमदार, विचारवंत, विविध विषयांवरील तज्ञ यांचे मार्गदर्शन घेणार आहे.
आपण समाजसेवी संस्था, उद्योग आणि व्यापारी संघटना आणि सामाजिक व सांस्कृतिक गटांशी त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी संवाद साधणार. गोमंतकीयांना आज विविध आघाडय़ांवर कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पर्यावरण, वारसा आणि अस्मिता धोक्मयात आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत सरकार अनभिज्ञ असल्यामुळे बेरोजगारीचा दर वाढत आहे. सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध जनआंदोलन सुरू करणे हे आपले पहिले काम असेल, असे युरी आलेमाव म्हणाले.