सर्वसाधारण सभेत मंजुरी : मूळ अंदाजपत्रकात 17 कोटी 26 लाख 1 हजार रुपयांची वाढ : सभेत विविध 52 विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/कोल्हापूर
अखर्चित निधीच्या पुनर्विनियोजनासह 50 कोटी 57 लाख 64 हजार रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मूळ अंदाजपत्रक 33 कोटी 31 लाख रूपयांचे होते. त्यामध्ये 17 कोटी 26 लाख 1 हजार रूपयांची वाढ करण्यात आली. यासह विविध 52 विषयांवर चर्चा झाली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरूण जाधव, प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, मनिषा देसाई, शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे उपस्थित होते.
हे ही वाचा : वारणेची दूध खरेदी दरात वाढ
सभेत 2022-23 च्या आराखडय़ातील अखर्चित निधीच्या पुनर्विनियाजनासह सुधारित आराखड्य़ाला मंजुरी देण्याबरोबरच छत्रपती शाहू सभागृहाच्या नूतनीकरणासाठी दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. दुर्गम, अतिदुर्गम भागामध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी ठोक मानधनावर शिक्षकांच्या नेमणुकीचा निर्णय झाला. ज्या त्या गावातील किंवा शाळा परिसरातील पाच किलोमीटर अंतरातील ‘डीएड’ आणि ‘बीएड’धारक उमेदवारांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी 22 लाख 50 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या टेरेसवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर सिस्टिम बसवणे, बीट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैविक आणि सेंद्रीय खतांसाठी अनुदान देणे, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मानधन देणे, दिव्यांग निधीतील खर्चाचे पुनर्विनियोजन करणे, शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेची देखभालदुरूस्ती करणे असे विविध ठराव सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.