नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या औषध नियंत्रण प्राधिकारणाने (डीसीजीआय) मंगळवारी भारतनिर्मिती कोव्हॅक्सिन या कोरोनाविरोधी लसीच्या मात्रा 6 ते 12 वयोगटातील बालकांना तातडीचा उपाय म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. तसेच 5 ते 12 वयोगटातील बालकांसाठी कोर्बेव्हॅक्स तर झायडस कॅडिला कंपनीची झीकोव्हीड ही लस 12 वर्षांवरील मुलांना तातडीचा उपाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
कोव्हॅक्सिन निर्माण करणाऱया भारत बायोटेक या कंपनीला लसीसंबंधीचा सुरक्षा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. हा अहवाल बालकांच्या लसीकरणाचा प्रारंभ झाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी दर 15 दिवसांनी देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर पाच महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला एकदा हा अहवाल द्यावा लागणार आहे. लसीचा दुष्परिणाम कोणता होत आहे आणि त्याचे प्रमाण किती आहे, याची माहिती अहवालात द्यावी लागणार आहे, असे औषध नियंत्रण प्राधिकरणाने स्पष्ट केले.
लवकरच उपलब्ध होणार
या लसी केव्हा उपलब्ध होणार याची माहिती केंद्र सरकारने दिलेली नाही. मात्र येत्या काही महिन्यांमध्ये त्या उपलब्ध होतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या चौथ्या उद्रेकाची शक्यता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणाची व्यापक योजना सिद्ध करण्यात आली आहे.