बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या सामान्यसभेत ठराव संमत
वार्ताहर /हिंडलगा
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात शासनामार्फत कोणतीही विकासकामे मंजूर झाल्यास ती सुरू करण्याआधी ग्राम पंचायत अध्यक्ष, पीडीओ व सदस्यांना वर्कऑर्डर दाखवूनच कामे करावीत, असा ठराव नुकत्याच झालेल्या सामान्य सभेत सर्वानुमते मांडण्यात आला. ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा प्रेमा हिरोजी होत्या.
काही दिवसांपूर्वीच हिंडलगा येथील पंचायतीचे कंत्राटदार संतोष पाटील यांनी केलेल्या कामांची बिले शासनाकडून मिळत नसल्याच्या नैराश्येतून उडुपी येथील लॉजमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते. याबाबत खबरदारी म्हणून बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या सदस्यांनी हा निर्णय घेतल्याचे सभेमध्ये सांगितले. तसेच खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य किंवा इतर कोणत्याही खात्याचा फंड असला तरी वर्कऑर्डर दाखवूनच संबंधित कंत्राटदारांनी कामे सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
आलेमारी समाजासाठी घरे बांधणार
याप्रसंगी उपस्थित नोडल अधिकारी सागर चिक्कमठ यांनी ज्योतीनगर येथील आलेमारी (डोंबारी) समाजाच्या नागरिकांसाठी सर्व मूलभूत सुविधा पुरवून ग्राम पंचायत व्याप्तीमधील सरकारी खुल्या जागेत घरे बांधून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच ज्योतीनगरमधील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्न केलेल्या आजी-माजी सदस्यांचे अभिनंदन केले. तर सदस्य संदीप डावाळे, पप्पू भोसले, लक्ष्मी सिंघे यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. या सभेला पीडीओ गंगाधर नाईक, उपाध्यक्षा, सेक्रेटरी व सर्व सदस्य उपस्थित होते.