कॅन्टोन्मेंट बैठकीत निर्णय : 24 तास पाणी योजनेत कॅन्टोन्मेंटचाही समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
महसूलवाढीसह थकित महसूल वसुलीसाठी आवश्यक पाऊले उचलण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत घेण्यात आला. महसूलवाढीसाठी बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवाकंदील दर्शविण्यात आला. तर अनधिकृत बांधकाम आणि किल्ल्यातील बंद असलेल्या पथदीपांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का करण्यात आले? असा प्रश्न ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी उपस्थित केला. मात्र याबाबत कॅन्टोन्मेंटच्या अभियंत्यांना समर्पक उत्तर देता आले नाही.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा गुरुवारी ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. विशेषतः महसूलवाढीसंदर्भात तयार केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. महसूलवाढीच्या दृष्टीने तीन ठिकाणी बहुमजली व्यापारी संकुले तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बहुमजली पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
विविध समस्या निवारणासाठी एल ऍण्ड टी, महापालिका आणि कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांची समन्वयक बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. त्यावेळी पाणी समस्येच्या विषयावर चर्चा झाली. तसेच शहरात 24 तास पाणी योजना राबविण्यात येत असून कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतून जलवाहिन्या घालणे आवश्यक आहे. याकरिता जलवाहिन्या घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डची परवानगी हवी. तसेच काही ठिकाणी जलवाहिन्या लांब अंतराच्या घालाव्या लागत आहेत. त्यामुळे काही मुख्य रस्त्यांवरून जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी देण्यात आल्यास अंतर कमी होणार आहे. त्याकरिता जलवाहिन्यांचा मार्ग बदलून द्यावा, अशी मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे करण्यात आली आहे. या प्रस्तावाबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कॅन्टोन्मेंट परिसराचा समावेश 24 तास पाणी योजनेत करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी दिली. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवासियांनाही 24 तास पाणीपुरवठय़ाचा लाभ मिळण्याची शक्मयता आहे. त्याचप्रमाणे उद्यान देखभाल आणि अन्य विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा
यावेळी लोकनियुक्त सदस्य सुधीर तुप्पेकर यांनी जनतेच्या तक्रारींबाबतची माहिती सभागृहात मांडली. काही अनधिकृत बांधकाम करण्यात येत असून काहींना नोटीस बजावून कारवाई केली जाते. काही अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे असे का होत आहे? याबाबतची विचारणा तुप्पेकर यांनी केली. त्यामुळे अनधिकृत बांधकामांबाबत कोणती कारवाई केली जाते, अशी विचारणा ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मन्नूरकर यांच्याकडे केली. अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी नोटीस बजाविण्यात येते. काही अनधिकृत बांधकामधारकांना यापूर्वी नोटीस बजाविण्यात आल्याचे सांगितले. नोटीस बजाविल्यानंतरही बांधकाम केल्याची बाब सुधीर तुप्पेकर यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे नोटीस बजाविल्यानंतर पुढे काय करता? अशी विचारणा अध्यक्षांनी अभियंत्यांकडे केली असता कोणतीच कारवाई केली नसल्याचे सांगितले. तर नोटीस दिल्याचा काही परिणाम झाला का? अशी विचारणा करून अनधिकृत बांधकामांबाबत नोटीस दिल्यानंतर काम थांबविण्याची जबाबदारी इमारत बांधकामधारक आणि कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांची आहे. मग कॅन्टोन्मेंटचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करतात? असा मुद्दा ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी उपस्थित केला. यापुढे अनधिकृत बांधकामांबाबत नोटीस बजाविल्यास कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली.