अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन सोलापूरला निघालेल्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात एक जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात उड्डाणपुलावर पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस ( क्र के ए ०१ ए एम ०५१० ) उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. मोहमद नासिर अहमद वय ५३ रा कलबुर्गी असे मयताचे नाव आहे.यासह नागम्मा मलम्मा पुजारी वय ५४ रा रायचूर कर्नाटक, रुकय्या बेगम म गफूर शेख वय ७७ रा मुंबई, अमरिश कोंडी वय ३७ रा चिंचोळी कलबुर्गी, सतीश कुमार वय ३९ रा गोरमेटकल यादगीर, अप्पाराव कट्टे वय ६५ खजुरी ता आळंद व अनिल राठोड वय २२ मोतीलाल तांडा शहापूर यादगीर असे ६ जण जखमी झाले आहेत.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसमधील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची खबर डॉ सत्यजित बाबर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांनी दिली असून पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.