Tarun Bharat

रेशन दुकानचालकांची मनमानी…काटामारी!

गैरप्रकाराबद्दल शहरातील असंख्य रेशनकार्डधारकांची तक्रार : नियमांकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

दारिद्र्या रेषेखालील कुटुंबांना साहाय्यभूत ठरण्यासाठी सरकारने अन्न व नागरी पुरवठा खात्यातर्फे रेशनधान्य देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे रेशन वितरण करताना दुकानचालक मनमानी व काटामारी करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

दुकानांची वेळ सरकारने ठरवून दिली आहे. शिवाय धान्य आल्यानंतर लगेचच ते वितरित करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. मात्र, हे दोन्ही नियम रेशन दुकानचालक धाब्यावर बसवत आहेत. ज्यादिवशी गोदामातून दुकानात धान्य पोहोचते, त्या दिवसापासूनच धान्याचे वितरण करणे आवश्यक आहे. मात्र, दररोज हेच काम कुठे करू, असे म्हणत काही रेशनदुकानचालक 20 ते 30 तारखेदरम्यान धान्य देण्यास सुरुवात करत आहेत.

याशिवाय दुकानाची वेळ सकाळी 8 ते 10 व सायं. 4 ते 8 अशी आहे. परंतु, यावेळेचे पालन बहुसंख्य दुकानदार करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही धान्य वितरित करताना अर्धा ते एक किलो धान्य कमीच भरले जाते. शहरातील असंख्य रेशनकार्डधारकांची ही तक्रार आहे. परंतु, तक्रार केल्यास रेशनदुकानदार धान्य देण्यासच टाळाटाळ करतो, अथवा निकृष्ट धान्य देतो. म्हणून ग्राहक तक्रार न करता हा अन्याय सहन करत आहेत.

यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दुकानदारांनी सकाळी 8 ते 10 व सायं. 4 ते 8 यावेळेत दुकान सुरू ठेवणे आवश्यक आहे. धान्य नसले तरीही दुकान उघडणे बंधनकारक आहे. शिवाय धान्य असल्यास कोणत्याही परिस्थितीत ते वितरित केले पाहिजे, असे स्पष्ट केले.

जर ग्राहकांना उपरोक्त नियमांपैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत आहे, असे आढळून आल्यास त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. वजन कमी असल्यास परत दुसरीकडे वजन करून तपासून घ्यावे व ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ातील नऊ तालुके होणार खुले

Tousif Mujawar

सांडपाणी सोडले चक्क गटारीमध्ये

Amit Kulkarni

केएलईमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद

Amit Kulkarni

जंगली प्राणी, पक्षांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

Tousif Mujawar

प्रगत तंत्रज्ञानाबरोबर भामटय़ांनीही साधलीय प्रगती!

Omkar B

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणार महामेळावा

Patil_p