आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप : बोगस ठराव घालून संगणक उतारे देत असल्याची तक्रार
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी आपला मनमानी कारभार चालविला आहे. बोगस ठराव घालून संगणक उतारे देत आहेत. यासाठी ग्रामस्थांकडून 15 ते 20 हजार रुपये घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. काही ग्रामस्थांकडून काम करून देतो म्हणून पैसे घेऊन देखील त्यांना ताटकळत ठेवल्याने अखेर त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी वीणा हडपद या ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
गेल्या एक वर्षापासून ग्रामविकास अधिकारी वीणा हडपद हे अगसगे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता पैसे घेऊन अनेक बेकायदेशीर कामे केली असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
जी. पी. एस. करण्यासाठी पैसे
मागील वर्षी अतीवृष्टीमध्ये पडलेल्या घरांचे जी. पी. एस. करण्यासाठी काही जणांकडून 10 हजार तर काही जणांकडून प्रत्येकी जी. पी. एस. करण्यासाठी 2-2 हजार रुपये घेतल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
बोगस उतारे
ग्रामपंचायतीत असलेल्या संगणक अर्जदारांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून बाहेरच्या बाहेरच प्रत्येकी संगणक उताऱयाला 15 ते 20 हजार रुपये घेऊन बोगस ठराव संगणक उताऱयामध्ये घालून बोगस उतारे देत आहेत. ते संगणक उतारे घेऊन बँका, सोसायटीमध्ये कर्जे घेण्यास गेल्यास संगणक उताऱयाचा ठराव नंबर मागण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये येऊन मासिक बैठकीच्या दप्तरमध्ये ठरावच नसतो. यामुळे तो संगणक उतारा बोगस ठरत आहे. काही नागरिकांचे घर नोंदणी करतो, संगणक उतारा देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे लाटून त्यांना काही अडचणी सांगत आहेत. त्यांचे नंबर त्यानंतर ब्लॉकलिस्टमध्ये घालत आहेत. यामुळे त्यांना ग्रामपंचायतीचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
सोमवारी तीन महिलांची तक्रार
ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीला गेल्याची माहिती मिळताच म्हाळेनट्टी येथील दोन, महिला व अगसगे येथील एक महिला ग्रामपंचायतीला येऊन ग्रामपंचायत सदस्यांसमोर पी. डी. ओ. विरोधात तक्रार केली. संगणक उतारा आणि आस्ती रजिस्टरमध्ये नाव नोंदविण्यासाठी वीणा हडपद यांनी आमच्याकडून 20 हजार रुपये घेतले आहेत. तरी अद्याप आमचे काम केले नाहीत. आमचा नंबर उचलत नाहीत. ब्लॉकलिस्टमध्ये नंबर घातले आहेत, अशी तक्रार केली. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी वीणा हडपद यांना धारेवर धरले. सदस्यांना देखील त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.
जिल्हा पंचायतीला निवेदन
ग्रामविकास अधिकारी वीणा हडपद यांनी ग्रामपंचायतीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता पैसे घेऊन गैरमार्गाने अनेक बोगस कामे केली आहेत. गावच्या विकास कामांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. ग्रा.पं.ला वारंवार गैरहजर असतात. अतीवृष्टीच्या घरांचे जी. पी. एस. करण्यासाठी पैसे घेतात. सर्वसामान्यांची कामे करत नाहीत. यांची त्वरित बदली करावी म्हणून जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही. यांना दि. 11 मे रोजी निवेदन दिले होते.
ग्रा. पं. ला टाळे ठोकण्याचा इशारा
ग्रामविकास अधिकाऱयांची बदली करावी म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीकडे अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. तरी अद्याप त्यांची बदली केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी पिडीओची 8 दिवसांच्या आत बदली न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
दोन वर्षांपासून ग्रामसभा नाही
गेल्या 2 वर्षांपासून ग्रामसभाच झाली नाही. यामुळे ग्रामस्थांची व शेतकऱयांची कामे झाली नाहीत. ग्रामसभेबाबत तालुका पंचायतीला विचारल्यास आपण तुमच्या ग्रामपंचायत पीडीओना ग्रामसभा घेण्याच्या तारखा दिल्या होत्या. त्यांनी घेतली नाही, अशी उत्तरे मिळत आहेत. कामचुकार पीडीओमुळे शेतकऱयांना मिळणाऱया शासकीय सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे.