युएईत मिळाले प्राचीन मोत्यांचे शहर
पुरातत्वतज्ञांनी संयुक्त अरब अमिरातच्या उत्तर शेखडोममध्ये एका बेटावर फारसच्या उपसागरातील सर्वात जुने मोत्यांचे शहर शोधले आहे. या ठिकाणी नैसर्गिक स्वरुपात मोती मिळविले जात होते. पुरातत्वतज्ञांनी सोमवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
उम्म अल-क्वैनमध्ये सिनियाह बेटावर या शहरात आढळून येणाऱया कलाकृती सापडल्या आहेत. एकेकाळी हे हजारो लोकांचे वास्तव्य असलेले शहर राहिले असो असे मानले जात आहे. हे शहर पूर्व इस्लामिक काळ आणि सहाव्या शतकातील आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये मोत्यांच्या शहराचा उल्लेख आहे. फारसच्या आखातातील देशांमध्ये पहिल्यांदाच हे भौतिक स्वरुपात सापडले असल्याचे पुरातत्व तज्ञांचे म्हणणे आहे.
हे विशेष करून आखाती देशांमध्ये मोत्यांच्या शहराचे सर्वात जुने उदाहरण आहे. व्यापाराच्या दृष्टीकोनातून दुबई सारख्या शहरांचे हे जणू पूर्वज असावे. शोध लागलेले शहर हे दुबईपासून 50 किलोमीटर अंतरावर असून उपसागराशी जोडलेले असल्याचे युएई युनिव्हर्सिटीत पुरातत्व विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका टिमोथी पॉवर यांनी सांगितले आहे. वर्षभरापूर्वी या बेटावर पुरातत्व तज्ञांनी 1400 वर्षे जुन्या ख्रिश्चन प्रार्थनास्थळाचा शोध लावला होता. मोत्यांचे शहर या स्थळाच्या दक्षिण दिशेला असून ते 12 हेक्टरमध्ये फैलावलेले आहे.
उत्खननादरम्यान येथील घरांना समुद्रातील खडक अन् चुनादगडाचा वापर करत तयार करण्यात आल्याचे आढळून आले होते. येथील घरे देखील वेगवेगळय़ा प्रकारची आहेत. या घरांना अंगण देखील होते. केवळ एका विशिष्ट कालावधीत मोती मिळविण्याकरता लोक येथे राहत असावेत असे संकेत मिळाले आहेत. युएईच्या इतिहासात पर्लिंग म्हणजेच मोती मिळविण्याची प्रक्रिया विशेष महत्त्व राखून आहे. पर्लिंगचा व्यापार पहिल्या महायुद्धानंतर जगभरात प्रभावित झाला होता.